Thursday, February 5, 2015

120. Book Binding

Thousand Moon: Shri. Mudaliar
Contributed By Nilima Kulkarni

Mr. Mudaliar turned 80 years on 15 Feb 2014.  He still works for 5  hours everyday in his own shop of book binding. He is in perfect health. Coming from the humble beginning, he is a self-made man. I met him as a customer - for binding a religious book. I was impressed with his integrity, humbleness and moral values. He charged me only 20 Rs. for binding my old religious book,  saying that it was  his offering to Goddess of knowledge - Devi Saraswati.  He then told me about his loving caring wife. She passed away few years ago. He started going to the temple everyday because that was her passion.Here is the account in Marathi:



सहस्त्रचंद्रदर्शन : श्री. ए. आर. वेन्कटराव मुदलियार
नीलिमा कुलकर्णी
क्ल्रार्क्सबर्ग, न्यू जर्सी
      
काही माणसे एकदा भेटली तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात नितांत आदर निर्माण होतो. श्री. मुदलियार त्यातले एक आहेत. त्यांची भेट माझ्या एका कामानिमित्त झाली. एक दुर्मिळ वेदांताचे पुस्तक मला बाईंड करायचे होते. बुक बाइंडीग हा विरत चाललेला व्यवसाय आहे. मी पुण्याला अनेक ठिकाणी चौकशी केली. काही निष्पन्न निघाले नाही. नागपूरला एका पुस्तकाच्या दुकानात चौकशी केली. त्याने एका प्रिंटरचा पत्ता दिला. मी प्रिंटरकडे गेले. ते बरेच कामात होते. तरीही ‘आम्ही हल्ली फक्त स्पायरल बाइंडीग करतो. पण मी तुम्हाला ‘लक्ष्मी बाईंडर’ चा पत्ता देतो.’ म्हणत त्यांनी बाईंडरचा पत्ता व त्याच्या दुकानापर्यंत जाण्याचा नकाशा काढून दिला. तिथे जाऊन मी पुस्तक बाइंडीगला टाकलं.
       पुस्तक तयार होणार त्या दिवशी तो नकाशा घेऊन मी निघाले. आटोरीक्षाचे शोभेचे मीटर, रिक्शावाल्याची उपकार केल्यासारखी त्यांची वृत्ती पाहून मी वैतागले. रिक्षावाला  १०० रुपये मागत होता. शेवटी ८० वर तयार झाला. तिथे पोहोचल्यावर गल्लीत रिक्षा जात नाही म्हणून त्याने मला रस्त्यावर सोडलं. मी १०० ची नोट दिली तेव्हा ‘चिल्लर नाही’ म्हणत तो रिक्षावाला निघून गेला. २० रुपयांपेक्षा, आपल्याला फसवले म्हणून मला वाईट वाटले. मनात चरफडत मी बाईंडरकडे पोहोचले. बहुतेक पुस्तक झालंच नसणार. हा उद्या या म्हणणार, झालं तरी हा जास्तीचे पैसे मागणार अशा नकारघंटा मनात वाजू लागल्या. लक्ष्मी बाईंडर’ म्हणजे झेंडा चौकातून पुढे गेलं कि एका अरुंद गल्लीत एका छोट्याशा घरात हा उद्योग आहे. एक छोट्या खोलीत, एक मशीन, पुस्तकांचे ढीग, आणि त्यात बुडालेले काम करणारे  एक गृहस्थ बसले होते. त्याने मान वर न करताच आतल्या दाराकडे बोट दाखवले. ते ‘ऑफिस’ – तिथेही पुस्तकांचे ढीग, एम्बोसिंगचे मशीन या पसाऱ्यात एका छोट्या डेस्कपुढे एक वयस्क गृहस्थ बसले होते. मी पुस्तकाबद्दल विचारण्याआधीच त्यांनी पुस्तक काढलं. ‘हे घ्या.’ कव्हर पाहूनच मी खुश झाले. तुमचे कव्हर तसेच ठेवून मजबूत केले आहे. नंतर त्यातले बारकावे दाखवून किती काळजीपूर्वक काम केलं आहे हे त्यांनी पटवून दिलं. आजोबांनी जीव ओतून काम केलं होते. किती पैसे घेणार हे आधी विचारायला हवं होते. मी मनाशीच म्हटले. पुस्तक दुर्मिळ असल्याने कितीही पैसे देण्याची माझी तयारी होती. पण ‘कितीही’ ची लांबी किती वाढणार याची काळजी वाटू लागली.
‘किती झाले पैसे?’ मी श्वास रोखून विचारलं. रिक्शावाल्याचा अनुभव ताजाच होता.
‘२० रुपये.’  ते म्हणाले. ‘किती?’ मी पुन्हा विचारलं.
‘२० रुपये.’
‘इतके कमी कसे?’ मी न रहावून विचारलं
‘धार्मिक पुस्तकांचे आम्ही कमी घेतो. हे तर दुर्मिळ पुस्तक. तेव्हढीच सरस्वतीची सेवा. ‘ ते नम्रपणे म्हणाले. मी भारावले. आणखी २० ची नोट पुढे करत मी म्हटलं, ‘तुमच्या या सेवेबद्दल घ्या.’
‘छे! त्यात काय. जेव्हढे झाले तेव्हढे द्या. जास्तीचे काय करायचे?’ पैशापेक्षा नीतीमूल्य महत्वाची असणाऱ्या या आजोबांबद्दल मला आदर वाटू लागला.
‘आजकाल असं कुठे बघायला मिळत नाही.’ मी म्हटलं.
‘मी आजकालचा नाही. १५ फेब्रुवारीला मला ८० वर्ष होतील.’ मी तर उडालेच. साधारण साठीचे दिसणारे ते गृहस्थ, शिवाय कामही त्याच पद्धतीने करीत होते. मला त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं.
अस्खलित मराठी बोलणारे मुदलियार आजोबा तामिळ घराण्यातले असले तरी त्यांचे पूर्ण आयुष्य नागपुरात गेलं होतं. त्यांच्या वडिलांनी ठरवले होते, कि आपण ज्या प्रांतात रहातो तीच मुलांची मातृभाषा. म्हणूनच सरस्वती विद्यालाय सारख्या तामिळ शाळेत न घालता त्यांनी मराठी शाळेत मुलांना घातलं. मुदलियार आजोबांनी मराठीत खूप वाचन केलं आहे. घरची परिस्थिती अगदी हलाखीची होती. दर महिन्यात आईचे दागिने गहाण ठेऊन वडील महिन्याचे शेवटचे दिवस भागवायचे. २ भाऊ, २ बहिणी असे कुटुंब. तेव्हा हलाखीत दिवस काढतांनाचं ठरवलं, आपण जास्त पोरवडा वाढवायचा नाही. मामांचा बाइंडीगचा व्यवसाय होता. त्यांच्याकडे शिकायचे ठरवलं. मामा खूप कडक होते, पण शिस्तीचे. आजोबाना  नीतीमूल्य त्यांनीच शिकवली. ‘तराजू घ्या, पण दांडी मारू नका’, ‘दुसऱ्या कोणाला फायदा होत असेल तरच खोटे बोलावे’ असे मामा म्हणत.
सचोटीने धंदा करायला मामांनी शिकवला. त्या प्रक्रियेत भरपूर मारही दिला. एकदा तर इतके बदडले कि मुदलियार जीव द्यायला अंबाझरी तलावावर गेले. तेथे सायकल ठेवली, पाण्यात उतरले. पाणी खूपच गार होते. एक दोन तासांनी उतरावं म्हणून मागे फिरून एका झाडाखाली बसले. तिथे विचार करता करता झोप लागली. मनात अनंत काणेकरांची वाक्य घोळू लागली , ‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगला, स्वत:साठी जगलास तर मेलास.’ त्यांच्या मनात आलं, म्हणजे आत्ताचे आयुष्य नसल्यासारखे आहे. खूप विचार केला. आत्महत्येने काही हाती लागणार नव्हते. स्वत:चा वेडेपणा लक्षात येऊन आत्महत्येचा विचार टाकून दिला.
पुढे स्वत:चा व्यवसाय सुरु केला. अंथरूण पाहून पाय पसरायचे हे तत्व. खाजगी आयुष्यात कधी लक्ष्मण रेषा ओलांडली नाही. तामिळ लोकांमध्ये मामेघरी सून करून देतात. पण अशा संदर्भात पुढच्या पिढीत शारीरिक प्रोब्लेम येतात असं कुठेतरी वाचलं. म्हणून नात्याबाहेरची मुलीशी लग्न करायचे ठरवलं. आजोबा सांगत होते, ‘ मी लक्ष्मीशी लग्न केलं आणि माझं भाग्य उजळलं. तिच्यामुळेच मी हा व्यवसाय यशस्वी केला. तिने उत्तम साथ दिली, ती सतत देवाधर्माचे करीत असे. तिच्या पुण्याईनेच शून्यातून सुरवात करून आज स्वत:चं घर आहे, हा धंदा आहे. संसारातही २ मुले १ मुलगी सर्व आपापल्या जागी आनंदात आहेत.
       मोठा मुलगा व्यवसायात मदत करतो. आजोबा साठी उलटेपर्यंत पूर्णवेळ काम करीत असत. आता सकाळी ८:३० ते १:३० पर्यंत काम करतात. पहाटे ३ ला उठणे, १ तास चालणे, अर्धा तास व्यायाम. नियमित मोजका आहार, यामुळे त्यांची तब्येत उत्तम आहे. पोथी वाचणे, मंदिरात जाणे हे श्रद्धा म्हणून नव्हे, तर बायकोला ते आवडत असे म्हणून ती गेल्यावर आपल्या दिनचर्येत घातलं आहे. श्री मुदलियार आज कृतार्थ आहेत. व्यवसाय, मुले, नातवंड सगळीकडून प्रेम मिळते आहे. म्हणून आणखी जगावसं वाटतं असं ते म्हणतात.
पुस्तके बाईंड करता करता  मुद्लीयारांनी पुस्तकातील तत्वज्ञान आयुष्यात उतरवलं आहे. असंच प्रेम लाभत त्यांना शताब्दी गाठू दे.  हीच परमेश्वराजवळ प्रार्थना.
****************************************************************************



 



No comments:

Post a Comment